==============
बंड्या : ऐ झिंप्या, ते मॅरेथॉन म्हणजे काय रे ? आजकाल सारखं मी काही ना काही एकतो .. अमक्याच्या तमक्याने अमूक तमुक मॅरेथॉन धावली.
झिंप्या : मॅरेथॉन म्हणजे .. धावायचं रे फक्त ?
बंड्या : धावायच … ?
झिंप्या : हो
बंड्या : अरे पण धावयचं म्हणजे नक्की काय? कुठून कुठे धावायचं ?
झिंप्या : अरे धावायचं फक्त .. कुठनहि कुठे
बंड्या : अरे च्या मारी काय पण भलतच .. आणी कोणी धावायचं …?
झिंप्या : कुणी पण धाऊ शकतं …
बंड्या : कुणी पण …?
झिंप्या : हो , हो कुणी पण ..
बंड्या : कुणी पण
झिंप्या : हो तर, माणूस म्हणू नको , बाईमाणूस म्हणू नको ..
बंड्या : बाईमाणूस पण घावत्यात
झिंप्या : अरे मग काय, काही काही बायका माणसापेक्षा जोरात धावतात .. तर सांगायच म्हणजे काय, बाई म्हणू नको, माणूस म्हणू नको, लहान मोठं, म्हातारं कोतारं .. सगळी धावत्यात बघ मॅरेथॉन.
बंड्या : अन् कुठून कुठबी धावयचं , म्हणजे ईथनं मळ्यापर्यंत धावलो तर झाली का मॅरेथॉन?
झिंप्या : अरं तसं नाही .. २६ मैल तरी पाहिजे बुवा , ईथनं मळ्यापर्यंत १३-१४ मैल असेल, म्हणजे ..
बंड्या : हा म्हणजे , ईथनं जायचं मळयापर्यंत , मागल्या पावलीच परत इथपर्यंत यायचं…
झिंप्या : हा बरोबर .. पण धावत
बंड्या : धावत व्हयं
झिंप्या : हो धावत
बंड्या : अनं तु काय म्हनला मगाशी .. कुनीपण धावले तर चालतय..
झिंप्या : अरे चालतय काय, पलतय पलतय .. हा … मॅरेथॉन म्हणजे धावयचं … २६ मैल
बंड्या : जमतय कि मग
झिंप्या : कुणाला ..तुला ?
बंड्या : हो तूच म्हणाला नं कुणी बी धावलो तर चालतय
झिंप्या : हो , पण तयारी करावी लागते
बंड्या : मला नाही लागत
झिंप्या : असं नाही बंड्या .. लागते तयारी , नाही तर .. नुसतीच लागते .. ला .. ग .. ते … वाट
बंड्या : नाही लागत .. मीनं आधीच तयारी केली हाय, तु म्हनला नं कुनी बी धावलो तर चालतय .. बघ तू .. लाव पैज.. मळ्यापर्यंत मॅरेथान
झिंप्या : लावली पैज
बंड्या : बघ हा .. नंतर म्हणशील पैका नंतर देतो..
झिंप्या : अरे तू करून तर दाव ना मले आधी
बंड्या : बसंती … आ बसंती ..
(बंड्याची घोडी धावत येते , बंड्या घौडेदौड करत मळ्यापर्यंत जाऊन परत येतो )
बंड्या : ए झिंप्या , काढ पैकं .. धावलो कि नाही मॅरेथान …
झिंप्या : अरे तु कुठे धावला .. बसंती धावली, तु नुसताच बसला बसंती वर .. याले नाही म्हणत मॅरेथान
बंड्या : अरे पन तुच म्हणाला ना .. आता पलटी मारतोस..
झिंप्या : मी काय म्हणलो
बंड्या : कुनी पण धावलो तर चालतय .. माजी बसंती धावली ना … पुर्नं २६ मैल … काढ पैकं
No comments:
Post a Comment